Sunday, 20 May 2012

म्हातारी

          आयुष्याच्या वाटेवर खुप चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात रोज एक नवीन अनुभव आपण घेत असतो. जिवंत काही गोष्टी नकळत घडून जातात आणि काही कालांतराने त्या पुन्हा आपल्याला सापडतात. त्या एका वेगळ्याच रुपात. या रूपाचा आपण विचारही केलेला नसतो. अशीच एक गोष्ट आज आपल्यासमोर मांडतोय.

       सात वर्षापूर्वीची गोष्ट. आधुनिकीकरण म्हणून मी राहयचो त्या विभागात इमारतीचे बांधकाम होणार होते. त्यासाठी जो कालावधी लागणार होता तितके दिवस आम्ही दुसऱ्या कुठेतरी आपल्या पसंतीने भाड्याने खोली घेऊन राहणार होतो. त्यानुसार आम्ही भाड्याने रूम पाहायला सुरवात केली. बऱ्याच जागा पाहिल्यानंतर एक जागा आम्ही पसंत केली. रस्त्यालगतची, आणि शाळेपासून जवळ असल्याने आम्ही तेथे राहायला आलो.

         माझी शाळा त्यावेळी सकाळची असायची मी एक वाजेपर्यंत घरी यायचो आणि माझी आई जवळच कामासाठी जायची ती सुद्धा दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत कधीही जेवणासाठी घरी यायची. यावेळी घरी माझ्याशिवाय कोणी नसायचे  म्हणून मी शाळेतून आलो कि जेवणासाठी आईची वाट बघत थांबायचो. एकदा असाच मी शाळेतून घरी आलो. आणि टीव्ही पाहत बसलो होतो. आमच्या टीव्हीची रचना दरवाजासमोरच असलेल्या शोकेसमध्ये होती . त्यामुळे रस्त्यावरून येणारे जाणारे टीव्हीच्या काचेमध्ये दिसायचे. मी टीव्ही पाहण्यात गुंग असताना अचानक "बाय" असा आवाज कानावर पडला. अगदीच खालच्या स्वरातला आणि मंद असा पण धारदार आवाज कानावर पडला. टीव्हीत पहिले तर चेहरा दिसला नाही पण नऊवारी साडीत कोणी म्हातारी उभी आहे. असे मला दिसले. म्हणून मी दरवाजा जवळ गेलो.

        समोर एक चार फुट उंचीची सत्तरीतील म्हातारी उभी होती. न विंचरलेले केस, सुरकुत्या पडलेला चेहरा व त्यावर काळसर गुठ्या. गळ्यात लहानसे मंगळसूत्र गयावया करणारा चेहरा व आशेची नजर, काखेत अडकवलेली आणि हातात एक अशा दोन पिशव्या. तिने माझ्यासमोर हाथ पसरले आणि काही मागितले. मी तिला एक रुपया दिला. पण ती पुन्हा म्हणाली काही "खायला आहे का?" मी आणि माझी आई जेवायचे बाकी होतो म्हणून घरात जेवण शिल्लक होते. मी स्वयंपाकघरात गेलो आणि पहिले तर मला चपाती आणि भाजी मिळाली. मी त्यातील दोन चपात्या आणि थोडी भाजी तिला दिली. ती माझ्या दरवाजातच बसली आणि तिने ते पटतात खाल्ले. ती खूप भुकेली असावी असा मी अंदाज बांधला. काही वेळ ती तिथेच बसून राहिली व नंतर निघून गेली.

          ती आता रोज येऊ लागली. माझ्या आईला ही माहित झाले होते कि ही रोज येते. ती नेहमीप्रमाणे यायची काही खायला मागायची. खाल्ल्यानंतर "जाते" असा आवाज देऊन निघून जायची. आम्हीसुद्धा तिच्यासाठी जास्तीचे जेवण करायचो. तिला कधी यायला उशीर झाला तर माझी आई मला सांगून कामावर जायची. "म्हातारी आजी आली कि तिला हे दे किंवा ते दे". तिचे येणे, तिकडे बसून खाणे हे आमच्या रोजच्या जीवनाचा भाग झाले होते.

         माझी आई एकदा बाजारात बांगड्या भरत होती. इतक्यात ती म्हातारी तिकडे आली तिने आईला पहिले नाही पण ती बांगडीवाल्याला म्हणाली कि "मला त्या पिवळ्या रंगाच्या दोन बांगड्या भर ना." तो बांगडीवाला टाळाटाळ करू लागला. माझ्या आईने बांगड्या भरल्या आणि पैसे दिले. पण त्या बांगडीवाल्याकडे परत देण्यासाठी सुटते पैसे नव्हते. म्हणून माझ्या आईने त्याला सांगितले कि "राहिलेल्या पैशाच्या या आजीला बांगड्या भर". आणि बाहेर येऊन तिने त्या म्हातारीला सांगितले कि "तुझे पैसे दिले आहेत तू बांगड्या भर." यावर ती खूप खुश झाली.

            आमच्या विभागात इमारत बनली. आम्ही पुन्हा ते घर सोडले आणि इमारतीत राहायला आलो. आम्हाला त्या म्हातारीचा विसर पडला. ज्या घरात आम्ही राहायचो. त्याचेही नुतनीकरण झाले आणि तिकडे नवीन दुकान सुरू झाले. कदाचित ती म्हातारी तिकडे आली असावी पण आम्ही तेथे राहत नाही हे समजल्यावर तिने तिची वाट बदलली असावी.

            पाच-सहा दिवसांपूर्वी मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो. तिकडून परतत असताना एका टपरीवर काही घेण्यासाठी गेलो. आणि मागून आवाज आला "दोन रुपयाची पानं  द्या." आवाज परिचित वाटला म्हणून मी मागे पहिले तर ती म्हातारी उभी होती. हातातील पैसे मोजण्याचा तिचा प्रयत्न सुरु होता. पण दृष्टी साथ देत नसल्याने तिला त्यामध्ये अडथळा येत होता. मी तिच्या हातातील पैसे मोजून दुकानदाराला दिले. पानं घेऊन ती पुढेच असलेल्या वडापाव च्या गाडीवर वळली. आणि तिने त्याकडे काही मागणी केली असावी. तिच्याकडे पूर्ण पैसे नव्हते म्हणून तो वडेवाला त्याच्या आईच्या वयाच्या त्या म्हातारीवर जोरात ओरडला. ती काहीसी घाबरली आणि तिचा चेहरा पडला.

             मला तिची दया आली. ती जेंव्हा माझ्या दरवाजात यायची तेंव्हा मी तिला नेहमी काहीतरी खायला द्यायचो. त्यानंतर कदाचित तिने दुसरे घर शोधले असेल. पण आज ती पुन्हा उपाशी असेल म्हणून तिने त्या वडेवाल्याकडे मागितले. असेल तेही पैसे देऊनचं. मी पुढे गेलो तिचा हाथ धरला आणि तिला समोरच असलेल्या हॉटेल मध्ये नेले. तिकडे तिच्यासाठी वडे आणायला सांगितले. मी सुद्धा खूप दमलो होतो आणि खूप भूकही लागली होती. म्हून मी सुद्धा वडे मागवले आणि आज एका अनोख्या साथीदारासोबत न्याहारी केली. ती मला ओळखत नव्हती. तिचे खाऊन झाल्यावर मी तिला हॉटेलबाहेर आणले. आणि तिला काही पैसे दिले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. जणू काही देव माझी परीक्षा घेत असावा.

          तिला मदत केल्याने मला खूप समाधान मिळाले. माझा सगळा थकवा निघून गेला. भिकारी वाढवू नका असे म्हणणे मला पटते. पण जे काम  करू शकत नाहीत त्यांचे काय..? मी तिला आज मदत केली. उद्या ती काही खाऊ शकेल इतके पैसे तिला दिले. पण त्या दोन दिवसानंतरचे काय..? तिला दुसरा कोणी मिळेल का..? हा विचार करताच मी घरी परतलो.

          आपण मुंबईतील आपले जीवन किती एकलवाणे केले आहे. फक्त स्वार्थी विचार आपण करत असतो. घड्याळावर धावत असतो. कधीतरी ह्यांच्यासाठी आपण काही करू नये का? एखाद्या दिवशी आपण यांना मदत केली तर काही बिघडेल का? त्यासाठी खर्च होईल आणि तो मी का करू असा विचारही मनात येईल. पण त्यापासून मिळणारे आशीर्वाद कितीतरी महत्वाचे असतील नाही का? कारण पैसे महत्वाचे नाहीत त्यामागच्या भावना महत्वाच्या असतात. नको त्या वयात सहजच कोणी विडी, सिगारेट किंवा इतर कोणत्याही व्यसनासाठी पैसे खर्च करतात. मग तेचं पैसे इकडे वापरले तर... विचार करा.. निर्णय तुमचा...

                                                                                                                                             - रोशन मोरे

Thursday, 19 May 2011

आई

आई असते मायेचा झरा,
शिकवते सतत सत्याचा धडा...

आई असते फुलाचा वर,
गंध देते सर्वाना सारा....

आई असते ममतेची बाहुली,
मुलांना देते सुखाची सावली....

दुःख  भोगून क्षणोक्षणी,
मुलांना बनवते सुलक्षणी....

इच्छा होता कोणतीही मनी,
आई पूर्ण करते त्याक्षणी....

अशी आहे आई वात्सल्याची मूर्ती,
शब्द अपुरे पडती गाताना तिची कीर्ती....

अमरप्रेम

           निखळ मैत्रीचे खिस्से तर आपण खूप ऐकलेत पण निखळ आणि तंत्रशुद्ध प्रेम म्हणजे अमरप्रेम. यामध्ये कोणताही मोह नाही, कोणताही स्वार्थ नाही, आणि वासनेचा तर कणही नाही. प्रेम म्हंटल कि आपल्या समोर सर्वप्रथम कोणी येत तर रोमिओ आणि ज्युलीएट किंवा लैला आणि मज्नू. अगदी नाहीच नाही तर हिंदी सिनेमातला एखादा नट. पण अमरप्रेम ही कथा अशा किती भारतीयांना माहित आहे? अमरप्रेम शब्द नाही तर कथा. अमरप्रेम ही भारतातील एक सत्य घटना. ज्याचा उलगडा अजूनही झाला नाही कारण ही एका भारतीय खेड्यातील घटना आहे. "अमरप्रेम"  या शब्दावर एक मराठी मालिकाही काही दिवस चालली पण त्यात काही वेगळेच होते. काय माहित त्यांनाही या गोष्टीची कल्पना आहे कि नाही ते.
            भारतातील उत्तरांचल राज्यातील एका खेड्यातील ही गोष्ट आहे. एका रेल्वे स्थानकावर दोन आगगाड्या थांबल्या होत्या. सगळा गोंधळ होता. कुठे चणेवाला ओरडतोय तर मधेच चहावाला. जो तो आपल्या कामात व्यस्त होता. आणि इथेच सुरवात झाली त्या अमर प्रेमाची. एक अज्ञात तरुण मुलगा व एक सालस मुलगी समोरासमोरून जात होते. काही अंतरावर असताना त्यांची नजरानजर झाली. अगदी चार-पाच घटका अचानक सरून गेल्या, दोघजण बाजूने निघून गेले पण जाताना त्यांचा किंचितसा स्पर्श एकमेकांच्या हाताना झाला. बस्स हेच ते प्रेम. पुढे ते दोघेही आपापल्या दिशेने निघून गेले. जाताना दोघेही एकमेकांना पाहतच राहिले, त्या मुलीच्या बहिणीने तिला आवाज दिला.  आणि त्या मुलाला तिचे नाव माहित झाले. दोघांच्याही गाड्या निघाल्या, दोघेही निघून गेले. 
               जाताना त्या मुलाच्या मनात विचारचक्र सुरु झाले, फक्त तिचा आणि तिचाच विचार. कोण कुठली मुलगी पण ती दिसताच क्षणी काळजाचा ठोका वाजला. मन अजूनही मानत नाही कि ती निघून गेली. तिचा इतका विचार तो करायला लागला कि घरी पोहचेपर्यंत तो तिच्या प्रेमात वेडा झाला. आणि तिच्या नावाने जोर-जोरात ओरडू लागला. आणि वाट दिसेल तिकडे निघाला. तिचा तो विरह त्याला असह्य झाला होता. कोणाशी काही बोलणे नाही. कोणाला काही विचारणे नाही. फक्त तिचे नाव घेत तो चालू लागला. लोक त्याला मारू लागले,शिव्या देऊ लागले, लहान मुले मागून फिरून त्याला चिडवू लागली. 
                तब्बल साडेचार वर्षांनी तो मुलगा असाच भटकत असताना एका गावात पोहोचला, तिथेही त्याला इतर गावांप्रमाणेच वागणूक मिळाली. लहान मुले त्याला दगड मारत होती आणि तो त्या मुलीचे नाव घेत वाचण्यासाठी पळत होता. त्या गावातील एक मुलगा घरी गेला आणि त्याने "गावात कोणीतरी वेडा आला आहे, आणि तुझ्या नावाने ओरडत आहे" असे सांगितले.  त्या वेडयाचे वर्णन ऐकून त्या मुलीला धक्काच बसला. तिने हा तोच मुलगा आहे हे ओळखले आणि ती सुद्धा वेड्यासारखी पळत सुटली. त्या मुलाजवळ पोहचल्यावर त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अचानक शांत झाला.
                 त्या मुलीनेही धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागली. सर्व मुलांना बाजूला करून ती जवळच असलेल्या झाडाखाली बसली, मुलगाही तिच्या मांडीवर डोके ठेऊन बसला, आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागले. 'बस्स माझे प्रेम मला मिळाले' असे म्हणून त्याने तिच्या मांडीवरच प्राण सोडले, आणि त्याच क्षणी विरहात व्याकूळ होऊन त्या मुलीनेही त्याच अवस्थेत प्राण सोडले. संपले प्रेम. 
                काय पटतंय "संपले प्रेम" ........ नाही ना? म्हणूनच हे "अमरप्रेम". हे प्रेम कधी संपणे शक्यच नाही. भारत सरकारच्या वतीने या प्रेमाचा गौरव म्हणून तेथे त्यांच्या मृत्यू अवस्थेचे एक शिल्प उभारण्यात आले आहे. आणि त्याखाली कोरले आहे "अमरप्रेम". 
                                                                                                                                                                                                              
                                                                                                                                                                                                                                                                                                 -  रोशन मोरे

Wednesday, 18 May 2011


खुडलेला प्रेमांकुर
(आयुष्यातील काही क्षण कोणासोबत वाटता येत नाहीत, ते क्षण फक्त आठवणी बनून राहतात. लेखणी हा सुद्धा एक सुंदर दोस्त आहे ज्याला आपण आपल्या भावना सांगून आपले मन हलके करू शकतो.  यामुळे कोणाला काही कळत नाही, आपले मनही हलके होते आणि आठवणीही ताज्या राहतात.) 
   परीक्षा संपली कॉलेजमधून सगळे बाहेर आले. ती त्याची वाट पाहत बसली होती. गेटवर खिळलेली तिची नजर आणि त्यातील आतुरता स्पष्ट दिसत होती. अगोदरच्या काही दिवसात वाढलेले तेढ आणि नुकतंच माहित झालेलं एक कटू सत्य याचा विचार तिच्या मनात घोळत होता. त्याची वाट पाहतेय पण तो आल्यावर त्याला कसं सांगायच याची भीती तिला वाटत होती तिचा थरकाप उडाला होता.  या सगळ्या विचारात धुंद असताना अचानक समोरून तो येताना दिसला. हिची भीती वाढू लागली. त्याची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्या जवळ आला. नेहमीप्रमाणे तिची थट्टा करू लागला. पण हिच्या चेहऱ्यावरच्या हरकती आज त्याला साथ देत नव्हत्या. त्याच्या विनोदांना आज कोणताच प्रतिसाद नव्हता. तिचा चेहरा पुरता ओशाळला होता. डोळ्यातले अश्रूही आज साथ देत नव्हते. काही दिवसांपूर्वीचे भांडण आणि निवळत जाणारे गैरसमज हे त्यामागचे कारण असावे असे त्याला वाटत होते. त्याला तिचा थोडा राग आला पण त्याच्या प्रेमापुढे हा राग शुल्लक होता. ती हळूच म्हणाली, "तुला काहीतरी सांगायचं". त्याला वाटले काहीतरी रोजच्याप्रमाणे सांगेल म्हणून त्याने तितकसं महत्व दिले नाही. आणि मी येतो मग सांग असे म्हणून निघून तो गेला.  पुन्हा मित्रांमध्ये मिसळला. ही त्याला पाहतच राहिली आणि पुन्हा विचार करायला लागली. इतक्या आनंदी असणाऱ्या ह्याला हे कसं सांगावं? या विचाराने ती चकराऊन गेली.
   थोड्या वेळाने तो पुन्हा तिच्या जवळ आला. आज ती एकटीच थांबली होती. नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणी नव्हत्या. ती म्हणाली तुला काही महत्वाचं सांगायचय. त्याने होकारार्थी मान हलवली. तिने सांगितलं, "माझ्या पप्पानी माझं लग्न ठरवलंय, याचं वर्षी आहे." हे शब्द ऐकून तो थंड पडला, पण तिला समजू नये म्हणून थट्टेच्या सुरात बोलला, "congratulation" आणि पुन्हा येतो असं बोलून निघून गेला. तिला दिसेनासा झाला. ती त्याची वाट पाहत पुन्हा तिथेच बसून राहिली. आणि तो दुसरीकडे जाऊन शांत बसला, त्याला धक्का बसला होता. डोळ्यातले अश्रू आवरेनासे झाले होते. याला काही दिवसांपासून ज्या गोष्टीची चाहूल होती ते आज त्याने तिच्याच तोंडून ऐकले होते. तरीही ते अश्रू बाजूला सारून त्याला आता तिला सावरायचे होते.
   तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि 'चल निघूया' असं म्हणाला. दोघे निघाले, त्याचे शब्दच थांबले होते. ती त्याला म्हणाली, "खूप मजा वाटतेय ना, "congratulation" बोलायला". तो पुन्हा म्हणाला, मग अजून काय करू? लग्न तुझ्या वडिलांनी ठरवलंय आणि तुला विचारूनच ठरवलं असणार मग आता मी काय करणार..? तिच्या चेहर्यावरची जागा आता मात्र अश्रुनी व्यापली होती. याच्या मनात कालवाकालव होत होती पण तो काय करणार होता. त्याला ते अश्रू काट्यांसारखे भासायला लागले. मग त्याने समजावणीच्या सुरात म्हंटले, "सोनू, काही होत नाही. मी आहे ना? मी ठीक करतो सगळं, फक्त मला तुझी साथ हवी आहे. असं म्हणत त्याने रिक्षाला हात दाखवला, आणि दोघं रिक्षात बसले, तीच्या डोळ्यांतून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ह्याने प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला "नको घाबरू गं, आपण सगळं बरोबर करू, मी बोलतो तुझ्या पप्पांबरोबर, मी सांगतो त्यांना सगळं." तिला थोडा आधार मिळाला पण ती म्हणाली, "माझे पप्पा नाही ऐकणार, ते आपलंच खरं करणार, आणि हे लग्न करून राहणार" आणि पुन्हा रडायला लागली. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला विश्वास ठेव सगळं व्यवस्थित होईल. ती त्याच्या मिठीत हरवून गेली. थोडं दुख कमी झालं पण पुढे काय बोलावं त्याला काहीच सुचत नव्हतं. कोणतही दुख किंवा काळजी असली कि तो तिला मिठी मारायचा आणि त्याचा सगळी काळजी दूर व्हायची. तिच्या बाहुंमध्ये जणू ही एक जादू होती.
  रिक्षा थांबली, दोघेजण उतरले. आता तो तिला निरोप देत होता आणि उद्या पुन्हा भेटायचं असं आश्वासन घेत होता. पण आज तिच्या जाण्यात काही वेगळेच दुख होते. मला कायमची सोडून नको जाऊ असं त्याचं मन म्हणत होतं. ती निघून गेली आणि हा तिच्याकडे पाहताच राहिला. "bye " म्हणू नको असं त्याचा नेहमीचा हट्ट असायचा. कारण त्यामुळे कुठेतरी दूर जातोय असं वाटतं असं त्याचं म्हणणं होतं आणि ते तिलाही नकळत पटलेलं होतं. तिची एक सवय त्याला आजही खटकली होती. जाताना ती एकदातरी मागे वळून पाहिलं असं त्याला वाटायचं पण तिने मागे पहिलेच नाही. आता मात्र सगळे विचार ह्याच्या मनात दाटले होते. उभे राहण्याची ताकद नव्हती तरी तो तिथून निघाला आणि घरी आला. आज कुठेच मन लागत नव्हते म्हणून तो बाहेर निघून गेला. तो दुखी असला किंवा खूप आनंदी असला कि त्या ठिकाणी जायचा आणि एकांतात शांत बसायचा. शांत वातावरण आणि झाडांच्या सानिध्यातील त्याची ती एक आवडती जागा होती, आगदी अभ्यासाला देखिल तो तिकडेच जायचा. आजही तो तिकडे शांत बसला, पण आज तिकडेही मन लागत नव्हते, म्हणून हिरवळीवर डोळे मिटून शांत पडून राहिला. त्याच्या कानावरून तिचे शब्द हटत नव्हते. त्याला सर्व डोळ्यांसमोर येत होते. 
    शाळेनंतर कॉलेजमध्ये जाताना मुलींबद्दल तीव्र राग मनात होता. मुलींशी जास्त बोलायचं नाही आणि त्याच्या भानगडीत पडायचं नाही हा विचार तेंव्हा मनात होता. अगोदरच्या आयुष्यातील काही असे घाव संगती होते कि मुलींची त्याला एक प्रकारे भीती वाटायची. सगळ्या मुली सारख्याच असतात असे त्याचे मत होते. आणि कोणत्याच मुलीवर विश्वास ठेवायचा नाही किंवा त्यांच्याशी किमान बोलायचेही नाही असे त्याने ठरवले होते. एक वर्षात कॉलेजमध्ये फक्त एकच मुलगी त्याच्या ओळखीची होती. इतका तो त्याच्या मतावर ठाम होता. पण दुसऱ्याच वर्षी मैत्री झाली ती तिच्याशी, आणि मुली किती सुंदर असू शकतात हे त्यालाही कळले. बाजूला बसलेल्या मुलीचं निराळाच नाव आणि त्याची जिज्ञासू वृत्ती यामुळे त्यांची ओळख झाली. त्याने अचानक तिला विचारले कि "तुझ्या नावाचा अर्थ काय?" आणि हेच त्यांचे पहिले वाक्य. तिनेही त्याचे समाधानकारक उत्तर दिले. याचं संवादामुळे त्यांची ओळख वाढली आणि त्याचे मैत्रीत रुपांतर झाले. थोड्याच दिवसात ही मैत्री खूप वाढत गेली. त्याच्या  कविता तिला आवडायच्या आणि हा पण फक्त तिलाच त्या दाखवायचा. त्याच्यामधला हा बदल त्याच्या मित्रांना देखील अनपेक्षीत होता. मुलींबद्दल बोलताच लांब पळणारा मुलगा आज अचानक एका मुलीबरोबर इतका कसं बोलू शकतो..? हे त्यांना न सुटणार कोडं होतं.
      ती त्याच्या कविता वाचायची आणि त्यांची स्तुती करायची, त्याचे काही प्रेमपत्राचे लेखन देखील तिने पहिले होते. थट्टा मस्करी आता त्यांना रोजचीच झाली होती. एखाद दिवस जर दोघांमधलं कोणी आलं नाही तर त्यांना करमेनासं व्हायचं. अगदी रविवारची सुट्टी देखील त्यांना नकोशी वाटायची.. एकदा असंच त्याने तिला काही प्रेमपत्र दाखवले. तिनेही रोजच्याप्रमाणे वाचली आणि त्यांची स्तुती केली. हा तिला मस्करीत म्हणाला हे तुझ्यासाठीच होते. आता याचं उत्तर दे त्याने हे विचारल्यावर ती काही काळ सुन्न झाली आणि काही विचार करायला लागली. तिला तिच्या मागील काही दिवसात घडलेले प्रसंग आठवले. एका मुलावर अगदी मनापासून प्रेम केलं होतं तिने, लहान वयात पण खरे प्रेम केले होते. त्यामध्ये आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींना कदाचित घाबरून तिच्यापासून दूर झालेला तो, हे तिला पुन्हा आठवायला लागले. त्याच्यामागे पळणारी ती आणि तिला नेहमीप्रमाणे नाकारणारा तो. त्या दुखी दिवसातून ती नुकतीच सावरत होती आणि आज अशा शब्दांनी तिला पुन्हा सगळे आठवले होते. ह्या सर्व आठवणीने तिलाही "प्रेम" करायची भीती वाटत होती. तिचे ते दुखी दिवस तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. तिचा चेहरा अकस्मात रडवेला झाला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले आणि ते ह्याने अचूक हेरले नसते तर कमाल. तिला विचारले काय झाले? तिने काही नाही म्हणत विषय बदलला पण ह्याला समजले कि काहीतरी नक्की आहे. म्हणून ह्याने तिला हसवण्यासाठी पुन्हा तिची थट्टा केली आणि आजच उत्तर दे असं म्हणाला. तिने ही नकारार्थी मन हलवली. ह्यालाही हेच उत्तर अपेक्षित होते.
   पण ती इतकी दुखी का झाली? ह्याचा शोध घ्यायचा असे त्याने ठरवले. आणि तिच्या मैत्रीणीना गाठले आणि त्यांना हिच्या पूर्वायुष्याबद्दल विचारले. त्यांनीही सर्व स्पष्ट सांगितले. ह्या दूर झालेल्या दोघांना पुन्हा जवळ आणायच असा विचार त्याने केला. पण तिलाचं याबद्दल विचारायचं असे त्याने ठरवले. त्याने तिला विचारलं आणि तिने सांगितलं. पण काही दिवसात त्याच्याबद्दलचा राग आणि आता त्याच्याकडे पुन्हा न जाण्याचा विचार हिनेच त्यापुढे स्पष्ट केला. त्यावेळी ह्याचे विचार ह्याने पुन्हा बोलून दाखवले, "सगळ्या मुली सारख्याच असतात का?" हा प्रश्न त्याने तिला विचारला, काय माहित पण ह्या प्रश्नाने ती दुखावली गेली. आणि तिने सर्व स्पष्ट केले कि मी त्याच्या मागे फिरत होती पण तोच मला टाळत होता, तिला घरच्यांनी खूप मारले होते, खूप काही बोलले होते तरीपण ती त्याला विसरायला तयार नव्हती. पण तो मुलगा तिच्या भावनांना कदाचित नाही ओळखू शकला. "प्रेम" ह्या शब्दाचा अर्थच त्याला कळला नसेल कदाचित. तिने सांगितले कि सगळ्या मुली सारख्या नसतात काही मुलं पण अशी असतात. आणि ते कदाचित त्याला पटले होते.
   ह्या घटनेनंतर ते दोघ आणखी जवळ आले. एकमेकांच्या भावना ते दोघेही योग्य ओळखू शकत होते. त्यांच्यातील अंतर कधीच दूर झाले होते. दोघे एकमेकांसोबत इतके बोलत असायचे कि  कोणालाही ह्यांच्यात काहीतरी नक्की आहे असेच वाटायचे. त्यांना अनेकांनी तसे बोलूनही दाखवले पण त्यांनी त्याचा विरोध केला. ती मुलगी असूनही अनेकांशी भांडली. माहित नाही ती त्यासाठी इतक्या सर्वाना तोडायला कशी तय्यार झाली. त्यांच्यात फक्त एक शुद्ध मैत्री होती. कोणत्यावेळी त्याला काय बोलले तर तो हसेलं कोणत्या गोष्टीचा त्याला राग येईल ह्या सगळ्या गोष्टी तिला माहित झाल्या होत्या. आणि त्यालाही तिच्याबाबत ह्या सर्व गोष्टी माहित झाल्या होत्या. आणि दोघेही त्या गोष्टी जपत होते.
   रक्षाबंधन आले तेंव्हा ती त्याला म्हणाली कि त्यासाठी राखी आणली आहे आणि तिने त्याला ती दाखवली त्यानेही हात पुढे केला पण तिची एक मैत्रीण काहिसं म्हणाली आणि ती थांबली. तिने त्याला राखी नाही बांधली. कदाचित नियतीला ते मान्य नव्हते. पण तिने ती राखी जपून ठेवली. अगदी आजही ती राखी तिच्याकडे आहे हे त्याला माहित आहे. पण नंतर ते दोघे मैत्रीच्या नात्यात इतके हरवले आणि एकमेकांसोबत इतकं गुपित बोलायला लागले कि त्यांनी आजवर हे गुपित त्यांच्या कोणत्याही मित्र किंवा मैत्रिणी बरोबर शेअर केला नव्हतं. अगदी त्यांच्या आयुष्याच्या लहान-सहान गोष्टीही ते एकमेकांना सांगत होते. त्याच्या आयुष्यातील आनंद जणू त्याने एक वर्ष संपवला होता. पण ह्या वर्षापासून तिने त्याच्या आयुष्यात आनंद असा काही भरण्याची सुरुवात केली कि त्याला पुरता बदलून ठेवलं. असंच काही दिवस लोटल्यावर कॉलेज ने ठेवलेल्या साडी-टाय डे साजरा करायचा म्हणून ती त्याला समजाउ लागली पण नेहमीप्रमाणे त्याने ह्या सगळ्यात मला काहीच इंटरेस्ट नाही असेच सांगितले. पण ह्यावेळी तू माझ्यासाठी हा डे साजरा करायचास असं ती हक्काने म्हणाली आणि त्यानेही तो हट्ट पूर्ण केला. पण त्याच्या मनात त्याने विचार केला कि आपल्याला आजवर इतक्या हक्काने कोणी सांगितलं नाही आणि ही सांगते आणि आपणही ऐकतो. त्याने तिला त्या दिवशी आपली हक्काची व्यक्ती बनशील का असं विचारायचं ठरवलं. त्या दिवशी त्याने तिला एकटीला भेटायला सांगितले आणि ती सुद्धा त्याला आतुरतेने भेटली. त्याने तिला स्पष्ट सांगितले कि "आय लव्ह यु", माझं तुझ्यावर प्रेम आहे. ती हे ऐकून निघून गेली आणि त्याकडे ठेवली एक हुरहूर..  ती घरी गेली पण एकचं विचार करत होती. "हा मस्करी तर करत नसेल ना?" असा एकचं प्रश्न तिला पडला होता. तरीही तिच्याकडे उत्तर तय्यार होते. त्याने जेंव्हा तिला पहिल्यांदा मस्करीत विचारल तेंव्हाच ठरवलं होता कि ह्याने खरंच प्रपोज केला तर ह्याला होकार द्यायचा. तो तिलाही तिच्या आयुष्यासाठी योग्य वाटत होता.
   दोन दिवसांच्या सुट्टीनंतर ते दोघे पुन्हा भेटले. आणि त्याने तिच्यासाठी एक लेटर लिहिले कदाचित तिला त्यावरून विश्वास बसेल. तिने ते वाचले आणि त्याला परत दिले. त्यानेही ते सहजच खिडकीबाहेर उडवले आणि तिला विचारले कि माझं उत्तर काय? ती त्याला म्हणाली कि उत्तर त्या लेटर वर लिहिले होते. पण आता ते लेटर त्याकडे नव्हते. म्हणून त्याने पुन्हा तिला विचारले.. मनातून तो खूप हुरहूरला, नक्की तिने काय लिहले होते ते त्याला पहायचे होते. पण तिने नाही सांगितले. तीने त्याला विचारले कि तू नक्की सिरिअस आहेस का? मागे एकदा मस्करी केली होतीस. त्याने सांगितले कि तुझी शप्पत मी सिरिअस आहे. मग ती म्हणाली कि मी 'हो' पण बोलू शकते आणि 'नाही' पण. तुला नक्की काय अपेक्षित आहे? यावर तो म्हणाला कि निर्णय तुझा आहे, मला आयुष्यभराची साथ हवी आहे ती द्यायची असेल तर 'हो' म्हण. मला काहीही उत्तर दिलेस तरी माझा आणखी एक प्रश्न असेल. तू 'होकार' किंवा 'नकार' नक्की का दिलास? यावर तिने होकार दिला आणि म्हणाली कि तुझ्यामध्ये ते सर्वकाही आहे जे मला माझ्या लाईफ-पार्टनर मध्ये हवे आहे. तुझे विचार, वागण्याची पद्धत मला आवडते म्हणून मी होकार दिला. त्यालाही खूप आनंद झाला आणि त्याने तिच्या ह्या उत्तराला स्वीकारले.
   तो विचार मनात येताच त्याचे डोळे पुन्हा भरून आले. हिरवळीवर निजलेला तो उठला काही काळ अस्वस्थ झाला. पुढची आठवण आली तर तो वेडा होईल असे त्याला वाटत होते तरीही तिच्या पप्पांना भेटायचे हे त्याने नक्की केला होतं. त्याने कोणालातरी फोन लावला आणि तिच्या वडिलांचे नाव घेत सांगितले कि "ह्यांचा नंबर मला उद्यापर्यंत पाहिजे कोणत्याही परिस्थितीत" आणि फोन ठेवला. पुन्हा स्वतःला समजावत आणि आकाशाकडे पाहत, त्या देवाला काही सांगत तो पुन्हा हिरवळीवर पडला. आणि आठवू लागला.
  आता दोघांची मैत्री थांबून प्रेम सुरु झाले होते. एका नवीन नात्यात ते गुंतले होते. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या फ्रेंडसर्कलला सांगितली कि दोघांमध्ये काय नातं आहे ते आणि त्याची कोणी थट्टा करू नये अशी ताकीद ही दिली. इतकी चांगली मैत्रीण असूनही त्याने कधी तिचा नंबर मागितला नव्हता आणि तिनेही कधी त्याकडे नाही मागितला. आज पहिल्यांदा तिची मैत्रीण म्हणाली कि तुझा नंबर दे आणि त्याने तो देत नक्की फोन कर असे सांगितले. प्रेमातील गुलाबी गप्पा सुरु झाल्या. त्याच्या मोबाईलची रिंगटोन ही त्याच्याच नावाची होती. आणि ही सारखी ती रिंगटोन गुणगुणत बसायची. पण आपल्या प्रेमात काहीतरी वेगळेपण असावं असं त्यांना वाटत होतं. आणि हे प्रेम मैत्रीप्रमाणेच जपण्यास त्यांनी सुरवात केली. दोघेही आनंदी होते. 'मोह' या शब्दाला त्यांच्याकडे थारा नव्हता. अगदी दोघांना काय आवडेल हेच ते करत होते. कायम एकमेकांसाठी जगायचं असं त्यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं. कोणी विचार करेल कि ह्यामुळे  त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला असेल तर तसे काही नव्हते. दोघेही आपला अभ्यास करत होते आणि एकमेकांना गरजेइतका वेळ देत होते. कोणतीही सुट्टी त्यांना नकोच होती. अगदी रोज भेटावं असंच त्यांना वाटायचं.
   "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच आमच सेम असतं" त्याप्रमाणेच त्याचे रंग खुलत चालले होते. दिवस जसे सरत होते तसे त्यांचे प्रेम बहरत होते. पण यामध्ये कोणी आलं नाही तर त्या प्रेमात काय ट्विस्ट नाही असेच वाटायचे. आणि तसेच झाले दोघेजण जात असताना त्यांना रस्त्यात कोणी मुलांनी अडवले, आणि त्याला म्हणाले कि 'हिचा विचार सोडून दे ती आमच्या मित्राची गर्लफ्रेंड आहे'. तो समजून चुकला हे कोण आहेत ते. त्याने तिला तसे सांगितले आणि तिच्या पहिल्या प्रियकराचा नंबर मागितला. तिने तो दिला पण तू त्याला फोन करू नको मी त्याला भेटून सांगेल असं ती म्हणाली आणि त्याला शपत घातली. ती त्याला भेटली आणि त्याला आता आपल्या आनंदी आयुष्यात न येण्याबद्दल बजावले. त्याने तात्पुरते ते मान्य केले. संकट संपले असे समजून हे दोघे पुन्हा आपल्या प्रेमात बहरायला लागले.  पण कोणाला माहित होते कि हे सगळे तात्पुरते होते ते. त्याने पुन्हा ह्यांना त्रास द्यायला सुरवात केली. तिला रस्त्यातून जाताना ते सतावायचे पण कोणतीही भांडणं नको म्हणून ती त्याला कधी हे बोलली नाही. पण असेच एका दिवशी तो त्याचे काही मित्र घेऊन आला आणि तेच सगळं अगदी हिंदी फिल्म्स मध्ये पाहायला मिळतं तसं त्याला धमकावायला लागला. त्याचेही मित्र आले आणि मग चांगलीच जुंपली. आदल्या वर्षीचा भांडणांचा खूप मोठा अनुभव त्याकडे होता आणि तसे मित्रही होते. पण हे जर तिच्या घरी माहित झाला तर तिला त्रास होईल हा एकाच विचार करून हे भांडण त्यांनी मिटवले. पण ते सुद्धा तितक्या वेळापुरते होते. 
  तिच्या आयुष्यात ढवळा-ढवळ करणाऱ्या त्याला आता कदाचित तिच्या प्रेमाची जाणीव झाली होती आणि तो तिच्याकडे पुन्हा येण्याचा प्रयत्न करत होता. पण आता वेळ निघून गेली होती. तिला आता त्याचा खूप राग येत होता. त्याने पुन्हा पुन्हा तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या प्रेमासोबत बांधील आणि निस्सीम होती. त्याच्या कोणत्याही बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आणि ती आपल्या प्रेमासोबत राहिली. अनेक वेळा त्यांच्यात याचं कारणावरून भांडणं झाली. पण त्यांचे प्रेम इतका कच्च नव्हतं कि ते कोणालाही तोडता येईल. तिने त्याला कधीच त्या भांडणात पडून दिले नाही. प्रत्येक वेळी त्याला समजवून ती स्वतः भांडणं सोडवत होती. वर्ष संपले आणि आता त्यांचा विरह सुरु झाला अगदी २२ दिवस ती त्यापासून दूर होती पण त्यांना जणू ती २२ वर्ष वाटली असावीत. दोघेजण फोनवर बोलायचे पण त्यांची भेट घडली ती त्यानंतर. दोघेही खूप आतुर होते एकमेकांना भेटायला. गेल्या वर्षभरात तिची एक जवळची मैत्रीण तिने प्रेमाखातर गमावली होती. याने तिला पुन्हा संधी दे असे सांगितले पण हिचा रामशास्त्री काट्याचा नियम होता "एकदा कोणी मनातून उतरले कि, त्याला पुन्हा मनात जागा नाही" म्हणून ती मैत्रीण तिने गमावली होती. 
    नवीन वर्ष सुरु झाले, परीक्षांचे निकाल लागले, आणि आता कदाचित वाटा बदलणार असे चिन्ह होते. ह्याच्या दादाकडून त्याला बोलावणं आलं होता, परदेशी शिकायला जाण्याची संधी त्याला होती, आणि त्याने तिला हे बोलून दाखवले. पण इतका विरह तिला सहन होणारा नव्ह्ता, म्हणून तिने त्याला अडवले आणि समजावले. त्यालाही विरह नको होता आणि तो ही थांबला, पुन्हा त्याच कॉलेजमध्ये ते भेटले. आणि आठवणीत भर पडत गेली. भांडायला काही कारण नसलं तरी ते प्रेमाचा ओलावा टिकवा म्हणून काहीतरी कारण काढून नेहमी भांडत असायचे. दोघांच्याही मनात असं काही नव्हतं पण तरीही ते काहीतरी करा शोधून भांडायचे आणि पुन्हा लगेच गोड व्हायचे. प्रेमाच्या ह्या नात्यात ते दोघेही प्रामाणिक होते. आणि त्यांना ते माहित होते. पण तरीही दुसरी कोणी त्यांच्याशी बोलली तरी हिला त्रास व्हायचा. तिने त्याला तसं बोलूनही दाखवलं. तिच्यामुळेच तो मुलींशी बोलायला लागला होता आणि आता त्याच्या खूप मैत्रिणी होत्या. तो नेहमी मुलींच्या गराड्यात असायचा. एका वर्षात घडलेला हा त्याच्यातील बदल. पण तरीही तिला ते सगळे खटकायचे आणि नाही खटकले तर नवलच होते. 
     तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहशील हे ती नेहमी बोलून दाखवायची. "आणि मी निघून गेलो तर, माझ्यावर इतका विश्वास..?", त्याने विचारले. त्यावर तिचे उत्तर मनाला भावण्यासारखे होते. ती म्हणाली, "मला स्वतःवर विश्वास आहे" माझी पारख इतकी कच्ची नाही. आणि हे आज खरे ठरत होते. तो आठवत होता इतका माझाही स्वतःवर विश्वास होता का? त्याला काहीच सुचत नव्हते. त्याच्या बंद डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते. पण अश्रू कितीही अनावर झाले तरी तिला कधीच ते दाखवायचे नाहीत हे त्याने ठरवले होते. 
     तिचा त्यावर इतका विश्वास होता कि तिने स्वतःला बिनधास्त त्यावर सोपवले होते. आजवर जपलेले सर्वकाही ती त्यावर मुक्तपणे उधळत होती. तिला कसलीच भीती नव्हती कि तो तिच्यापासून दूर जाईल आणि त्यालाही तसं काही मनात आलं नाही. दोघेही प्रेमाच्या कोणत्याही सीमा पार करायला तयार होते पण ह्या सर्व गोष्टी त्यांना तितक्याश्या महत्वाच्या वाटत नव्हत्या. तरीही आपले प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग होता. आणि त्यांच्याकडून नकळत तो अवलंबला जात होता. सुखाच्या,आनंदाच्या गर्द छायेत दोघेही बागडत होते. काही अडचणी येत होत्या पण त्यांचे प्रेम त्यावर मत करत होते. ती एकदा त्याला म्हणाली कि माझ्या घरी मी काही बोलणं ऐकलं आहे, माझा लग्न ठरवलंय पण ते ग्रजुएशन नंतर होणार आहे. ती त्याला म्हणाली कि मला कोणासोबत नाही जायचं, तुझ्यासोबत राहायचं.. आणि त्यानेही होकारार्थी मन हलवली. त्याला इतकी चिंता वाटली नाही कारण अजून बरेच दिवस होते. ती रडायला लागली आणि ती त्याच्यासाठी सगळ्यांना सोडायला तयार आहे असेही म्हणाली. जसे दिवस सरले तसं ह्या सगळ्यांचा त्यांना विसर पडला.
     त्यांच्या प्रेमाचा दुसरा valentine ते साजरा करणार होते. तसं त्यांना त्या दिवसाचं विशेष असं काही महत्व नव्ह्तं कारण त्यांचा रोजचा दिवसही काही वेगळा नसायचा. ते भेटले, सर्व आज त्यांना चिडवत होते, अरे कुठे फिरायला जायचं असं काही बोलून दाखवत होते. पण हे दोन दिवसापूर्वीच फिरून आले होते. तसे ते कुठेही जाताना सर्वाना बोलवायचे पण कोणी आलं नव्ह्तं. आज कॉलेज सुटल्यावर ते रोजच्याप्रमाणे भेटले, त्यांच्यासोबत आज त्यांची एक मैत्रीण होती ती त्यांना काहीसे प्रश्न विचरत होती आणि हा त्या प्रश्नांची थट्टा करत होता. समजा तुमचं लग्न नाही झालं तर तुम्ही काय करणार? असं प्रश्न करून तिने तिच्याकडे उत्तरासाठी नजर फिरवली, पण काही उत्तर नाही म्हणून मग त्या मैत्रिणीने त्याकडे कटाक्ष टाकला. याने तिला मस्करीत एक फटका दिला आणि गप्प केले. पण ती मात्र आता निराश झाली होती. तिने त्या मैत्रिणीला विचारले कि तू असा प्रश्न का विचारलास? यावर तिने उत्तर देण्याचे टाळले. पण ह्यांनी तिला बोलते केले, आणि तिनेही सांगितले कि "मला असा ऐकायला आलाय कि हिचं लग्न ठरलंय" हे त्याने पहिल्यांदा पण ऐकले होते त्यामुळे त्याला जास्त काहीच नाही वाटले पण त्रास झाला. ती रडायला लागली, मैत्रीण निघून गेली आणि हे दोघे घरी निघाले. नेहमीप्रमाणे रिक्षाने ते जात होते. हिचं रडणं काही थांबत नव्ह्तं. त्याने तिला प्रेमाने जवळ केले आणि तिला समजावले, "आपण सगळं ठीक करू, फक्त मला तुझी साथ असुदे." असं बोलून, माझ्यावर विश्वास आहे ना? हा प्रश्न त्याने विचारात तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पहिले. तिने त्याला एक गोड चुंबन दिले आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले.
    ते खूप फिरत असायचे. घरातले तिला इतके अडवून पण ते दूरवर फिरायला जायचे. एकमेकांत हरवायचे. असेच एकदा ते एका देवीच्या मंदिरात फिरायला गेले. मंदिर डोंगरावर आणि शांत जागेत होतं. तिकडे त्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला, आणि आपल्या संसाराचं जणू मागणं मागितलं. नंतर बराच वेळ फिरल्यावर ते पुन्हा मंदिरात आले आणि पुन्हा देवीच्या पाया पडले. त्याने सहजच देवीच्या पुढ्यातले कुंकू उचलले आणि आणि स्वतःला लावले, आणि तिच्याकडे कटाक्ष टाकून तिला विचारले. तिनेही त्याला परवानगी दिली त्याने ते तिच्या कपाळावर लावले. हे काय घडले!! याचाचं विचार तो करत राहिला. त्याने देवीकडे पुन्हा हात जोडले आणि जे झालं ते सत्यात उतरावं असे काही मागणे मागितले. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने एक चुंबन दिले. तिला मस्करीत आणि काहीश्या विश्वासाने म्हणाला आता माझी झालीस आणि तिलाही विचारले कि जे झाले ते नक्की काय होते, जराही न कचरता तिनेही उत्तर दिले, कि हेचं कदाचित देवीला मान्य असेल.
    तिचे ते शब्द आठवताच तो उठून उभा राहिला. त्याच्या मनात विचार आलं खरंच देवीला हे मान्य होतं, कि अशी वेळ तुमच्या आयुष्यात येणार नाही म्हणून देवीने ती घडवून आणली होती. त्याने आकाशाकडे पहिले आणि त्या देवीला म्हणाला, तूच दिलस आणि आता तूच तिच्यापासून मला तोडत्येस. खूप उशीर झाला होता अंधार पडला होता, घरी जायला हवे म्हणून तो निघाला. घरी पोहोचल्यावर आज याचं काहीतरी बिनसलंय हे सगळ्यांच्या लक्षात आलं होता. कोणी त्याला काहीच बोललं नाही आणि तो ही ना जेवताच अंथरुणावर पडला. त्याला तिची खूप आठवण येत होती. झोप लागत नव्हती पण तरीही तो तसाच पडून होता.
      त्या मंदिरातून निघताना ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. जणू त्यांचे हे नातेच आता त्यांच्या नजरेत बदलले होते. ते एकमेकांचे जणू आता जन्माचे साथीदार असावे इतके ते पुढे निघून गेले होते. त्यांना कोणतेच बंधन नव्हते असे नाही, तरीही ते काही करायला घाबरत नव्हते. तो दिवस ते जन्मभर विसरू शकणार नव्हते. दुसऱ्याच दिवशी त्याने तिला विचारले कि काल आपल्यात घडले ते कदाचित योग्य नव्हते आणि त्याने तिची माफी मागितली. पण तिने त्याला समजावले कि हे मलाही मान्य होते म्हणून झाले, याला तू एकटाच जबाबदार नाहीस. जे काही झालं ते चुकीचं नव्हतं असं तिने त्याला पटवून दिले. आता या नात्याला अंकुर आला होता. त्याचा वृक्ष व्हावा हेच त्यांचे स्वप्न होते. बऱ्याच दिवसात त्यांच्यात कोणते भांडण नव्हते पण तरीही त्यांच्या नात्यातला ओलावा तसाच होता. त्याने तिला सहजचं एक कविता दिली, कवितेचे शब्द विरहाचे होते, पण त्याचा अर्थ लागत नव्ह्ता, पण तिचं कविता त्यांच्या जीवनास लागू होणार होती हे त्यालाही माहित नव्हते आणि तिलाही. 
        पण चांगले दिवस ते किती राहतील. आणि त्यांच्यात परत काही बिनसले. आयुष्यातून निघून गेलेला भूतकाळ आज पुन्हा त्रास द्यायला आला होता. पहिल्या प्रियकराला भेटायचं नाही ही त्याची ताकीद होती. कारण त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण तो अचानक तिला पुन्हा भेटायला आला. तिची माफी मागत होता त्याला तिच्या आयुष्यात पुन्हा परतायचं होतं. पण तीने त्याला स्पष्ट नकार दिला. आणि आपण ज्यासोबत आहोत त्यासोबत खुश आहोत हे सांगितले. पण हे सगळे तीने त्याला कळवले नाही आणि त्याला ते दुसऱ्याच मार्गाने समजले. त्यांच्यामध्ये एक गैरसमज झाला. तो तिला खूप काही बोलला, तिला खूप रागावला. तिची चूक नसूनही तिने त्याची माफी मागितली, पण रागामध्ये आंधळ्या ह्याला तिची जराही दया आली नाही, तो तिचे काहीच ऐकायला तयार नव्हता. यावर काहीतरी तोड म्हणून तिने त्याकडे शिक्षा मागितली, आणि त्याने निर्दयी असल्यासारखी तिला शिक्षा दिली. माझ्याशी दहा दिवस बोलायचे नाही असे त्याने सांगितले, पण त्याला कुठे माहित होते कि हेच दहा दिवस त्याच्या जन्मात बदलतील. तिला शिक्षा दिल्याने तो ही दुखी होता. ती त्याला रोज दिसायची पण त्यापासून दूरच उभी राहायची. हा सुद्धा तिला चोरून पहायचा आणि तिला उदास पाहून हा पण उदास व्हायचा मात्र तिच्यासमोर खूप खुश असल्याच तिला भासवायचा. त्याचं हे दूरावनं त्यांच्या मित्र-मैत्रीणीना ही पाहावत नव्ह्तं, म्हणून त्यांनी बोलावं यासाठी त्यांनी प्रयत्न करून पहिला. ते यशस्वी झाले, पाच दिवस दुरावल्यानंतर ते दोघेही खूप आतुर होते एकमेकांशी बोलायला. त्याने सुरवात केली आणि ते बोलायला लागले. तिने पुन्हा झाल्या प्रकारासाठी माफी मागितली आणि रडायला लागली. त्याने तिला जवळ घेतले आणि आता का रडतेस ते विचारले पण तिने काहीसे कारण दिले. खरे कारण तिलाच माहित होते, आता हा आपल्यापासून दुरावणार ह्याचा खूप त्रास तिला होत होता. आणि ते ह्याला सांगायचे हे एक मोठे संकट तिच्यापुढे होते.
    आज त्याला झोप लागलीच नाही आणि कदाचित तिलाही घरी झोप लागली नसणार. आता यापुढे काय करायचे याचाच विचार तो करत होता. तिच्या वडिलांशी बोलायचं हे त्याने नक्की केला होतं. तिची परवानगी नव्हती पण तिचं ऐकत राहिलो तर ती आपल्याला कधीच भेटणार नाही हे त्याला माहित होते. म्हणून काहीही झालं तरी त्यांच्याशी बोलायचं हे त्याने ठरवले. त्याने तिच्या वडिलांना कधी पाहिलेही नव्हते. आणि तो त्यांना भेटणार होता. त्यांना काय सांगायचे, काय बोलायचे, याचा पूर्ण विचार त्याने केला होता. त्याने फक्त तिच्यामुळे स्वतामध्ये कित्येक चांगले बदल घडवून आणले होते. आणि तिलाही पूर्ण बदलून ठेवले होते. नेहमी लगेच रागावणारी मुलगी पण तिचा हा स्वभाव त्याने इतका बदलला होता कि आता तिला राग येतचं नव्हता. अगदी वडापावशिवाय काही खायचं माहित नव्हतं पण आता त्याच्यासाठी ती वडापाव विसरून दुसऱ्या डिशही तितक्याच आवडीने खात होती. असे तिच्या स्वभावात, वागण्यात तिच्या सगळ्या सवयींमध्ये त्याने बरेच बदल घडवून आणले होते. त्यांनी एकमेकांना जन्माचे साथीदार मानलं होतं, पण सामाज हा एक कलंक नेहमीच या प्रेमाच्या आड येत असतो मग तो यावेळी कसा अपवाद ठरेल. त्यांनी एकमेकाना आपलं कधी आणि कसं मानलं हे ओरडून, जीव तोडून  सांगितलं तरी कोणाला पटणार नव्ह्तं किंवा कोणी पटवून घेणार नव्ह्तं. तरीही तो निरर्थक प्रयत्न करणार होता. 
     त्याने तो प्रयत्न केला, पण त्याचा काही वेगळाच परिणाम झाला. तिला खूप त्रास सहन करावा लागला. आणि त्याच्याखातर तिने तो त्रास सहन केला. पण याचा काहीच उपयोग झाला  नाही. कायद्याचे मार्ग होते पण त्यांना ते जमणारे नव्हते. तिचे प्रेम तर होते. पण माहित नाही का ते, आज ती सुद्धा त्याला साथ देत नव्हती. त्याला एकाकीपणा जाणवत होता. प्रेम ही आयुष्यात केलेली एक मोठी घोडचूक असावी असे त्याला वाटत होते पण त्याचा तिच्यावर विश्वास होता. तो पुन्हा तिला भेटला आणि तिला विचारले. तिने त्याला सांगितले कि मला पप्पानी हे सगळे करायला सांगितले, कदाचित ती त्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हती. पण तरीही त्याने महिनाभर तिचं मन वळवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ती तिच्या निर्णयावर स्वतः खुश नव्हती पण तरीही तिला ते सगळं करावं लागणार होतं. तिच्या घरी समजल्यावर आता ती घराबाहेर येऊ शकत नव्हती. तरीही एकदा तिला भेटायचे होते. घरच्यांच्या विरोधाला न मानता ती त्याला भेटली. वीस दिवसांनी ती त्याला भेटली होती,. खूप काही बोलायचे होते पण शब्दच सुचत नव्हते. जगणे नकोसे झाले होते. विरह सहन करण्याच्या पलीकडला होता. तिने त्याला समजावले, माझे आयुष्य तर संपल्यासारखेच आहे पण तुझे आयुष्य रंगव. मला त्यात समाधान असेल. पण त्याला तिच्याशिवाय जगणेच शक्य नव्हते. दोघेही दुखात बोलत होते, तो आजही तिला वळवण्याचा प्रयत्न करत होता. पण ती नात्यांमध्ये गुंतलेली होती. त्याच्यापेक्षा जवळचं कदाचित तिला कोणी वाटलं नसेल म्हणून तिने त्यालाच दुखावले होते. तो समजून घेईल ही एक आशा तिच्या मनात होती, पण तो ही तिला समजून घेण्याच्या पलीकडे होता. त्याला त्याच्या आयुष्यात ती हवीच होती. तिची जागा दुसऱ्या कोणाला देण्याचा विचारही तो करू शकत नव्ह्ता. त्याने तिला मिठी मारली आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले. त्याने ठरवल्याप्रमाणे तिला त्याचे अश्रू आजही दिसून दिले नाहीत. तिच्या नवीन आयुष्याची सुरवातच योग्य नव्हती त्यामुळे ती खुश राहील हे सुद्धा तो मान्य करू शकत नव्ह्ता, तिला हे माहित असूनही ती त्याचं ओघात वाहत होती. प्रेमाला बहर येण्याआधीच, प्रेमाच्या या अंकुराला तिच्या वडिलांनी आणि समाजाच्या भीतीने खुडले होते.
     कित्येकांनी त्याला समजावले कि तिने तुला फसवले, तिने खरे प्रेम केलं नाही. पण त्याला या कोणत्याच गोष्टी पटण्यासारख्या नव्हत्या. त्याच्या प्रेमावर आणि देवावर त्याचा पूर्ण विश्वास होता. ती माझीच आहे, कुठेही गेली तरी ती माझीच राहणार. तिच्या ह्र्दयातली त्याची जागा दुसरे कोणी घेऊच शकणार नाही ही त्याची खात्री होती. पण त्याचा काहीच उपयोग नव्ह्ता, कारण ती त्याला कधीच भेटणार नव्हती. शेवटचा एक दिवस ती त्याला काही क्षणासाठी भेटली. पण जास्त बोलणं झाला नाही, तिच्या बोलण्यावरून ती पुन्हा येणार असे चिन्ह होते पण खात्री नव्हती. तरीही तो तिची वाट पाहायला तयार होता. तिच्या विरहात मारण्यापेक्षा तिची वाट पाहण्याचा मार्ग त्याला योग्य वाटला आणि त्याने तो मार्ग निवडला. पण हा मार्गही काही दिवसांनी संपणारा होता. ती आलीच नाही तर हा विचारही मनात होता. पण जर माझे प्रेम खरे असेल, आणि तिनेही माझ्यावर प्रेम केले असेल तर ती नक्की येईल, आमच्या प्रेमाला कितीही अडथळे आले तरी कोणी रोखू शकणार नाही हा त्याचा विश्वास होता.
  ती निघून गेली आणि हा तिच्या आकृतीकडे पाहत राहिला. प्रत्येक दिवस फक्त तिच्या आठवणीत आणि तिची वाट पाहण्यात सुरु झाला......
     मित्रानो त्याने तिला काय कविता भेट दिली होती वाचणार...
कशी फुलेल आपली प्रीत
एकमेकांचा निरोप घेताना, खूप दुखी होतो आपण
लवकरच परत भेटायचं, असंही ठरावतो आपण

अश्रुना मोकळी वाट करून, खूप रडत असतो आपण
रडायचं नाही असं ठरवत, उगाचच  खोटं हसतो आपण

नात टिकवायच ठरवलंय आपण, आयुष्याच्या शेवटपर्यंत
माझीच राहशील ना सखे, अखेरच्या श्वासापर्यंत

सोबत आहे आपल्याला, विश्वासाची अन प्रेमाची 
पण मध्येच येते भिंत, घरच्यांच्या प्रतिष्ठेची

कदाचित तुला घरच्यांसाठी, दुसऱ्याशी लग्नही करावं लागेल
तूझं सर्वस्व असणाऱ्या मला, त्यांच्यासाठी दुखवावं लागेल

दुखवू शकत नाही मी सुद्धा तुला, म्हणूनच मरणाचा विचार करेल 
पण तूझा विचार करता क्षणी, आपोआप ते पाऊल अडेल

तुला दिलेल्या वचनांसाठी, त्यांच्या सोबत जगेल
जगेन कसलं, जगण्यापेक्षा रोज तीळ तीळ मरेन

तुझ्यावर प्रेम असून सुद्धा, तूझा विरह सोसेल
आठवणीवर जगताना, रडतानाही हसेल

तरीही असेल ओढ मनात, तुझ्या मिलनाची
वाट पाहत असतील डोळे, तुझ्या एका झलकेची

काय म्हणावं याला, माझ्या प्रेमाची हार कि जीत
सांग सखे खरंच सांग, कशी फुलेल आपली प्रीत?


त्याची आता फक्त एकचं इच्छा होती कि तिच्याकडून कधी असे उत्तर येऊ नये....

मीच फ़सवलय त्याला.. 

आता वाटते हातातील लेखणी मोडुन टाकावी
फ़ाडुन् टाकाव्यात् त्या कविता ,
फ़क्त शव्ब्दांच्या जाळ्यात् गुंफ़लेल्या,
आणि ओरडुन् सांगावे जगाला ...
हो!मीच फ़सवलय त्याला!

आज थांबवलय मि फ़सवायचे
स्वतःला आनि त्याला हि
मुक्त केलय त्याला प्रेमाच्या खेळातुन्
आणि ओरडुन् सांगितले जगाला ...
हो!मीच ..

उन्मळुन पडलाय् तो मुळापासुन्
विश्वास उडालाय् त्याचा प्रेमावरुन्
आणि ह्रुद्यात आहेत फ़क्त जखमा!
पण्! मला महित् आहे
जखमा कधि तरि भरतील
प्रेमाचे अंकुर कधितरि पुन्हा फ़ुटतिल
दुःखातुन हि तो वर येईल आणि
नव् जग निर्माण् करेल

पण्!
नसत जमल त्याल्या पांडव होवुन
आपल्याच् नात्यांशी झगडन्
ना जमल असत जपलेल्या मुल्यांचा
स्वतःच्या हातानी हसं करण,
कदाचित् नव जग उभाहि केल असत्..
पण् नसत जमल त्याला त्यात वावरण!

म्हणुन मीच वाटा बदलल्या
उध्वस्त केली ति स्वप्न
आणि आता..
जगत आहे त्या चुरगाळलेल्या पानाना कुरवाळत
आणि त्याच्या वेदना मुकपणे सोसत्..

कारण!मीच फ़सवलय त्याला..फ़क्त् मीच्!
                                                                             -रोशन मोरे